Friday, January 11, 2013

सत्संग भाग

देव तारक तारक । देव दुष्‍टांसी मारक ॥१॥
गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
शत्रुलागीं आधीं मारी । भक्तसंकटीं रक्षी हरी ॥३॥
जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन अंतरीं ॥४॥

वारीकरी संप्रदायाचे तत्वज्ञान जाणण्यासाठी एकटया जनाबाईच्या जीवनचरित्राचा अभ्यास पुरेसा आहे.समाजातील अत्यंत अस्पृश समाजात जन्मलेली शेण गोवर्‍या गोळा करणारी,लोकांच्या घरी घरकाम  करणारी जनाबाईने आपल्यातील असामान्य प्रतिभेमुळे वारकरी संप्रदायामध्ये मानाचे स्थान प्राप्त केले.
प्रस्तृत अभंगामधून संत जनाबाई सांगतात की, देव हा सर्वशक्तीसंपन्न असून हया संपूर्ण विश्वाचा नियंत्रक आहे. देव हा तारक अर्थात सर्वाचे पालन, पोषन करणारा आहे.देवाचे तारक हे रूप करूणा ,प्रेम, मार्गदर्शन करणारे आहे. देव आपल्या चूकांना विवेकरूपी दिपाने दाखवून आपल्याला वाईट मार्गापासून परावृत्त करून सन्मार्गावर आणतो.आपल्यातील घृणेचे प्रेमात रूपांतर करतो.
धरलासी अवतार दुष्टा माराया।साधू संतजन पृथ्वी ताराया।।
देव दुष्टांचा नाश करण्यासाठी  अवतार घेवून खरा अर्थाने सज्जन ,सात्वीक लोकांचे रक्षण करतो.देवाचे अवतार कार्य हे दुष्टांचा नाश व साधूचे रक्षण हेच आहे.भक्ताच्या रक्षणार्थ देव हा सदैव तत्पर असतो. जनाबाई प्रस्तुत अभंगामधून मनुष्याला सांगतात की, देवाच्या असिम करूणेचा निरंतर आपल्या वर्षाव होण्यासाठी देवाचे भाव भक्तीने त्यांचे चिंतन करा.
संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद नगर मो.९९२३२०९६५८
 
 

पर्यटनासाठी जावे असे धार्मिक स्थळ विवेकानंद आश्रम

महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाच्या नावाने आता ओळखला जाऊ लागला आहे. जगद्गुरू, थोर संन्याशी, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या कार्याने प्रेरित होऊन प. पू. शुकदास महाराजांनी हिवरा आश्रम येथे १४ जानेवारी १९६५ रोजी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. किशोर वयातच भरपूर ज्ञान प्राप्त झालेल्या शुकदास महाराजांनी या ज्ञानाचा उपयोग जनकल्याणासाठी करण्याचे ठरविले. सुरुवातीला विवेकानंद आश्रमाच्या अकोला, नागपूर, मुंबई, पातूर, सस्ती, भौरद इत्यादी ठिकाणी शाखा होत्या. या प्रत्येक ठिकाणी जाऊन महाराज लोकांना भेटायचे, मार्गदर्शन करायचे, व्याधीमुक्त करायचे. आता मात्र प्रकृती अभावी हिवरा आश्रम येथेच महाराज लोकांना भेटतात व व्याधीमुक्त करतात. आतापर्यंत १ कोटी रुग्णांना महाराजांनी व्याधीमुक्त केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या रुग्णसेवेस विज्ञानाची जोड असल्याने बुवाबाजी, लिंबू, नारळ, अगरबत्तीला येथे थारा नाही. विवेकानंद आश्रमाचा नयनरम्य परिसर १५० एकरांचा आहे. गत ४७ वर्षांत या परिसराचे सौंदर्य बहरत चालले आहे. महाराष्ट्र शासनाने या आश्रमास ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे. आजमितीला या ठिकाणी श्रीहर मंदिर, शिवजलाभिषेकाची पावनधारा, आशुतोष भगवान शिव, श्रीहरी मंदिर, कोराडी प्रकल्पातील विवेकानंद स्मारक, भगवान बालाजी मंदिर ही पर्यटनस्थळे भेट देणाèयांना आश्चर्यचकित करतात. यासोबतच महाराजांनी दूरदृष्टी ठेवून परिसरातील व इतर ठिकाणच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणसंस्था व निवासस्थानाची व्यवस्था केली आहे. आश्रमाच्या वतीने सध्या ज्ञानपीठ, कर्णबधिर मुलामुलींचे विद्यालय, अपंग मुला-मुलींचे विद्यालय, विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय सुरू आहेत. दूरच्या विद्याथ्र्यांना येथेच निवासाचीसुद्धा व्यवस्था असून आश्रमाच्या नियमानुसार प्रवेश दिला जातो. शुकदास महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली दरवर्षी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. या वेळी हिवरा आश्रम येथेच यात्रा भरते. तीनही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते तर शेवटच्या दिवशी एकाचवेळी १५० टड्ढॅक्टरची मदत घेऊन एकाच भव्य महापंगतीत भाविकांना प्रसाद वाटण्यात येतो. लाखो भाविक दरवर्षी महाप्रसादाचा लाभ घेतात. यासोबतच दरवर्षी महाराजांच्या वाढदिवशी आश्रमात सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा होतो. इतरही वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर आश्रमाच्या वतीने उत्साहात साजरे होतात. आतापर्यंत या आश्रमाच्या नयनरम्य परिसराला व महाराजांना शिवसेना नेते मनोहर जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, कै. विलासराव देशमुख, गृहमंत्री आर. आर. पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, धर्मभूषण सु. ग. शेवडे, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, ह.भ.प. रामराव महाराज ढोक, डॉ. यशवंत पाटणे, सिंधुताई सपकाळ, प्राचार्य विठ्ठल वाघ, रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, जगद्गुरू श्रीश्रीश्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य (वाराणसी), श्री १००८ जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी, (केदारपीठ), श्रीमंत गिरीराज सूर्य सिंहासनाधिश्वर श्रीश्रीश्री १००८ श्री शैल जगद्गुरू उमापती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींसह नामवंत व्याख्याने, प्रवचनकार, कीर्तनकारांनी भेट देऊन कौतुक केले आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा दलित मित्र पुरस्कार देऊन महाराजांच्या कार्याचा गौरव महाराज मिशन संलग्न गुणवंत चराटे सेवा प्रतिष्ठान (मुंबई) द्वारा सेवा सम्राट पुरस्कार, दिवाळीबेन मेहता चॅरिटेबल टड्ढस्ट (मुंबई) द्वारा सन्मानचिन्ह व रोख रक्कम श्री महालक्ष्मी देवस्थान मुंबई, श्री मुंबादेवी संस्थान मुंबई, गुजराथी सेवा मंडळ माटुंगा, गावदेवी संस्थान माटुंगा, अपना फाऊंडेशन ऐरोली (नवी मुंबई), श्री शंकर मठ मुंबई, बुलडाणा जिल्हा मित्र मंडळ नागपूर, वारकरी शिक्षण संस्था आळंदी यासह अनेक समाजसेवी संस्थांनी महाराजांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. दु:खितांची दु:खे हलकी करणे व सर्वांना आनंद देणे या कार्याला वाहून घेतलेले शुकदास महाराज कोणत्याच देवाचे दर्शन घेत नाहीत, मंदिरात जात नाहीत. याबाबत महाराज सांगतात ते पुढीलप्रमाणे…
ज्या मी देवाचा, आहे उपासक ।
करूनि ओळख, देतो त्याची
या इकडे तुम्ही, पाहा तो नयनी ।
नटला रुपांनी, दु:खीतांच्या
गरीब-अनाथ, अपंग-दलित ।
तोचि हा पतीत, झाला अज्ञ
शुकदास म्हणे, हेचि माझे देव ।
अर्पिला मी जीव, त्यांच्यासाठी


अशा या महान संतास व त्यांनी उभ्या केलेल्या नयनरम्य आश्रमास भेट देण्यासाठी आल्यास निश्चितच वेगळे काही तरी शिकायला मिळेल यात शंका नाही.

सत्संग भाग ३

संतांचा महिमा कोण जाणे सीमा । सीणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१॥
संतांची हे कळा पाहतां न कळे । खेळोनियां खेळ वेगळाची ॥२॥
संतांचिया पारा नेणें अवतारा । म्हणती याच्या पारा कोण जाणे ॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य भेट जाली । कल्पना निमाली संतापायीं ॥४॥
-   संत नामदेव महाराज
प्रस्तुत अभंगातुन नामदेव महाराज संताचे जीवन कार्य व त्यांची महती वर्णन करतात.संतसंगतीमुळेच सामान्यातील सामान्य व्यक्तीला स्व स्वरूपाचा अनुभव सहज घेता येतो. संताच्या संगतीचा महिमा किता आणि कसा वर्णवा ?  हा मोठा गहन प्रश्न साक्षात ब्रम्हदेवाला सुध्दा पडावा एवढा संताचा महीमा अगाध व गहन आहे. मनुष्याला संताचे महीमा उमजला तरी तो शब्दातीत असल्यामुळे वर्णन करता येवून शकत नाही.मायेच्या पलीकडे असणारे गुहय ज्ञान प्राप्तीचा मार्ग केवळ संताच्या  संगतीनेच कळू शकतो. संत मोक्षरूपी संपत्तीने सामान्यातील सामान्य मनुष्याला सुध्दा श्रीमंत बनवितात. संताच्या जीवन हे समाज उध्दारसाठी ,उत्कर्षासाठीच असते. नामदेव महाराज म्हणतात की, असे संताची भेट झाल्यस जीवन धन्य कृतार्थ होते. मनातील कल्पना ,व्देष,लोभ आपोआप नष्ट होऊन जातात.संताचे अतःकरण म्ळणजे आत्मस्वरूप जागृत करण्याचे उत्तमातील उत्तम साधनच होय. संगतीने आत्मसुखाची प्राप्ती होवू शकते.
-संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद नगर,मो.९९२३२०९६५८

सत्संग भाग २

ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥
                                            -  संत चोखामेळा संत चोखामेळा आधुनिक विचार सरणीचे पुरस्कर्ते होते. समाजातील वाईट चालीरितीत बदल घडलाच पाहिजे हा विचारावर चोखामेळा विशेष भर देत. जग हे नेहमीच बाहय सौंदर्याला मोहून जाते. मनुष्य बाहयरंगावर फसुन जातो अंतरिकसौंदर्याची त्याला कल्पनाच येवू शकत नाही.बाहयरंगापेक्षा अतंरगाची सुंदरता अधिक शाश्वत व सत्य असते. संत चोखामेळा प्रस्तुत अभंगातुन प्रत्येक मानव जातीला अत्यंत मौलिक संदेश सांगताना म्हणतात ,ऊस दिसायला जरी वेडा वाकडा असला तरी त्याचा रस मधुर,गोडच असतो.धनुष्य दिसायला जरी वाकडा असेल तरी त्यामधून सुटणार तीर हा सरळच असतो. नदी वेडया वाकडया मार्गाने जरी प्रवाहीत होत असली तरी तीचे पाणी वाकडे नसते. त्या पाण्याने पथीत व्यक्तीची तान्हणच भागेल.चोखा जरी हिन असेल तरी त्यांची भक्ती  हिन ठरत नाही. त्याचा ईश्वरा प्रती असलेला भाव अतुट आहे. म्हणून वरपांगी दिसणार्‍या सौदर्यांला भुलून जाऊ नका असा संदेश चोखामेळा हया अभंगातुन प्रत्येक व्यक्तीला देतात.चोखामेळा सांगतात की, प्रत्येक व्यक्तीचा अंतरंगरूपी आरसा जोपर्यंत  स्वच्छ ,सुंदर होत नाही तोपर्यंत तो बाहयरूपालाच भाळेल आतील सौंदर्य त्याला दिसु शकणार नाही.

-संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद नगर ,
मो.९९२३२०९६५८

सत्संग भाग १

काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥
- संत ज्ञानेश्वर माऊली हरीपाठ


भगवत प्राप्तीची जी अनेक साधने शास्त्रांनी सांगीतलेली आहेत त्यांत स्थळ ,काळ ,शुची अर्थात पवित्रता इ.नियमाचे अत्यंत काटेकोरपण पालन करावे लागते.परंतु भगवंताच्या नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे काळ वेळेचे बंधन नाही.
भगवंताच्या नामाचे अखंड चिंतन,नामस्मरण केल्यामुळे मुनष्याला खर्‍या अर्थाने मानसिक शांती ,समाधान मिळते. आजचा काळ हा अत्यंत धकाधकीचा आहे. मनाचे संतुलन राखण्यासाठी मनशांती सुध्दी भगवंताच्या नामाचा जप करणे आवश्यक आहे. भगवंताच्या नामाचा जप ,उच्चारण करण्याकरीता कुठल्याही काळ,वेळेचे बंधन नाही . नाम घेतांना चित्त एकाग्र असणे आवश्यक आहे.भक्ताने शुध्द अंतःकरणात केवळ भगवंताच्या उच्चारण केले तरी पुरेसे आहे. कोठेही नाम घेतले तरी ते त्याच्यापर्यंत पोचणारच."जेथे उठे 'मी'चे स्फुरण तेथे म्हणा विठ्ठल विठ्ठल " असा तुकाराम महाराजांचाही उपदेश आहे.भगवंताच्या नामाच्या उच्चाराणे अनेक भक्त उध्दरले.आपल्या जिव्हेव्दारे जो भक्त अखंड नामजप करतो त्याच्या  दैवाला पारावार राहत नाही. ज्ञानेश्वर माऊली भक्ताला मार्गदर्शन करतांना सांगतात की,हया नामजपाने वैकुंठाचा मार्ग सहज सोपा होतो. म्हणून भक्तांने रात्रदिंनी केवळ भगवंताच्या नामाचे चिंतन,स्मरण,करावा असा मौलीक संदेश माऊली देतात.
भगवंत स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे आहे. त्याची सहज आणि अखंड अनुभूती घेण्यासाठी नामासारखे साधन नाही.
-संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद आश्रम
मो.९९२३२०९६५